
संत जनाबाई माहिती | Sant Janabai Information in Marathi
जन्म | अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड | |
---|---|---|
मृत्यू | अंदाजे इ.स. १३५० | |
राष्ट्रीयत्व | भारतीय | |
नागरिकत्व | भारतीय | |
पेशा | वैद्यकीय | |
वडील | दमा | |
आई | करुंड |
संत जनाबाई (अंदाजे १२५८ – १३५०) या हिंदू परंपरेतील एक मराठी संत कवयित्री होत्या. त्यांचा जन्म १३व्या शतकाच्या सातव्या किंवा आठव्या दशकात झाला होता. सुमारे ३५० अभंगांचे लेखन परंपरेने जनाबाईंनी केल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी पंथातील हिंदूंच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे.
अभंगांना खडीसाखरेची गोडी
शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अंभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत. आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग.पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई. सुखदु:ख जाणून घेणारी माऊली. अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकूळ होते.पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणार्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले, असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे ‘धरिला पंढरीचा चोर’ या अभंगातून ती सांगते. ‘माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे’ सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरुपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत.
जीवन
जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील “माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||” या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.
बालपण
परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होते. जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे पंधरा माणसांचे हे कुटुंब होते. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.
विठ्ठल-भक्ती
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
‘विठू माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्वरू।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हणले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत
अभंग-रचना
संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ती मिळाली होती.
संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ती-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत.
‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री-विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात.’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात.
प्रमुख संदेश आणि प्रभाव
समाजावर प्रभाव
जनाबाईंचा संदेश “भक्ती सर्वांसाठी” असा आहे. या संदेशामुळे सामाजिक विषमता, लैंगिक भेदभाव आणि कर्मकांडाच्या पातळीवर विचार करणारे लोक जागे झाले. त्यांच्या अभंगांनी स्त्रीभक्तीला सार्वजनिक मान्यता मिळवून दिली आणि इतर संतांच्या परंपरेत स्त्रियांचा आवाज अधोरेखित झाला.
आधुनिक काळातील महत्त्व
आजच्या काळात जनाबाईंचे अभंग आणि विचार सामाजिक समतेच्या, साधेपणाच्या आणि अंतर्गत शांततेच्या चर्चेतील संदर्भ म्हणून वापरले जातात. शैक्षणिक अभ्यासक्रम, भक्तगीतांच्या संकलनात आणि सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा संदर्भ कायम राहतो.