कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार
महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि धर्मकारणाचे अभ्यासक, संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार डॉ. सदानंद मोरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने सजलेला एक अनोखा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवा रिअॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होणार आहे.
या शोच्या घोषणेद्वारे सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १०८ स्पर्धक सहभागी होणार असून, हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा अभिमानाने गौरव करणार आहे. या शोचा शुभारंभ आणि पु. ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे एमडी आणि सीईओ गौरव बॅनर्जी, विविध संतांचे वंशज, या शोचे सूत्रसंचालक, गीतकार ईश्वर अंधारे तसेच परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील आणि ह.भ.प. राधाताई सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प. राधाताई सानप यांनी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षण व सामाजिक जागरूकता निर्माण करून महासांगवी संस्थानला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, तर ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी समाजप्रबोधनासाठी अपार मेहनत घेतली आहे. भक्ती आणि परंपरा जपत महाराष्ट्रातील संत परंपरेच्या वंशजांचा सन्मान यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित असलेले संत परंपरेचे वंशज – ह.भ.प. माधव महाराज नामदास (संत नामदेव महाराजांचे वंशज), ह.भ.प. रविकांत महाराज वसेकर, ह.भ.प. जब्बार महाराज शेख (संत शेख महंमद यांचे वंशज), ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर (संत तुकाराम महाराजांचे वंशज), ह.भ.प. जनार्दन महाराज जगनाडे (संताजी जगनाडे महाराजांचे वंशज), ह.भ.प. गोपाळबुवा मकाशिर (निळोबाराय महाराजांचे वंशज) आणि ह.भ.प. प्रमोद पाठक (संत बहिणाबाईंचे वंशज) यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला अधिक आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले, “सोनी मराठी वाहिनीने अतिशय अभिनव अशी संकल्पना मांडली आहे. महाराष्ट्राची समृद्ध कीर्तन परंपरा या नव्या स्वरूपात नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या शोच्या माध्यमातून मोठे योगदान दिले जात आहे. आजच्या कीर्तनकारांनी आपल्या निरूपणातून समाजप्रबोधन घडवले आहे आणि ही परंपरा असाच पुढे जाईल याची मला खात्री आहे.”
ते पुढे म्हणाले, “जग झपाट्याने पुढे जात आहे, त्यामुळे आपल्या परंपरा टिकतील का, असा प्रश्न पडतो. मात्र, या शोमधील तरुण कीर्तनकार पाहिल्यावर समजते की आपली सनातन परंपरा अमर आहे. महाराष्ट्राचा समृद्ध आध्यात्मिक वारसा ही आपली खरी ताकद आहे. कीर्तनाच्या माध्यमातून पिढ्यान् पिढ्या समाजप्रबोधन आणि सामाजिक एकता साधली गेली आहे. या परंपरेचा गौरव करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या मंचाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
Leave a Comment